अंतर्मुख करून सोडण्याची लक्षणीय ताकद जीएंच्या सगळ्याच लिखाणामध्ये आहे आणि दर वेळेला त्यांचं एखादं पुस्तक वाचलं कि त्याची नव्याने जाणिव होते. अर्थातच "निळासांवळा" हा कथासंग्रह याला अपवाद कसा असेल! अवघ्या दहा-पंधरा पानांच्या कथेमध्ये सुद्धा त्यांची पात्रं अतिशय स्वष्टपणे डोळ्यांसमोर उभी राहतात आणि मनात घर करून सोडतात. अगदी सहजतेने ढोंगी माणुसकीचे पापुद्रे काढुन रूक्ष, रोखठोक मानवी स्वभावावर अगदी लक्ख प्रकाश पाडतात. तसं अधिकृतपणे बघायला गेलं तर जीएंचा हा प्रकाशित झालेला पहिला कथासंग्रह, पण भाषाप्रभुत्व आणि विलक्षण कल्पकता जन्मतःच उपजत असल्यामुळें मुद्दामहून सांगितल्याशिवाय हि जीएंची पहिली कलाकृती आहे असं वाटणारचं नाही!